नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कॉलेजरोडवरील कपड्याच्या शोरुममध्ये २८ हजारांच्या कपड्यांची खरेदी करून बिल भरताच पोबारा करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघा संशयितांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेरबंद केले असून, त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोहमंद अन्वर सैयद (२९, रा. प्रज्ञानगर, नानावली), प्रविण उर्फ चापा लिंबाजी काळे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनल रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कॉलेजरोडवरील कॅन्टाबिल शोरुममध्ये २५ मे रोजी दोघा संशयितांनी कपडे खरेदीच्या बहाण्याने गेले. संशयितांनी दुकानातून पॅंट, शर्ट, टीशर्ट, परफ्युम, बरमुडा असा सुमारे २८ हजार रुपयांचा ऐवज घेतला, परंतु बिल न भरताच त्यांनी दुकानातून पोबारा केला होता.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत असताना अंमलदार विशाल काठे, प्रशांत मरकड यांना संशयितांची खबर मिळाली होती. तसेच, पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला होता.
संशयितांची खबर मिळताच युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना खबर दिली. त्यानुसार, सापळा रचून शनिवारी (ता. १५) संशयित सय्यद यास अटक करण्यात आली. गुन्ह्याची कबुली देतानाच त्याच्यकडून चोरीचे १७ हजार ७०० रुपयांचे कपडे जप्त करण्यात आले. तसेच त्याचा साथीदार चापा काळे यास कॅनलरोड परिसरातील शिताफीने अटक करण्यात आली.
दोघा संशयितांना जेरबंद करून अधिक तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयितांच्या तपासातून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, नाइक विशाल देवरे, समाधान पवार आदींच्या पथकाने केली.