नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): विविध गुन्ह्यांची उकल करताना संशयित चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी फिर्यादीदार असलेल्या मूळ मालकांना परत केला आहे. शुक्रवारी (ता.१५) पोलिस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत २४ लाख १ हजार ९०८ रुपयांचा जप्त मुद्देमाल परत केला आहे. यामध्ये तब्बल १४ लाख २८ हजार ९०८ रुपये किमतीच्या शंभर स्मार्टफोनचा समावेश आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालमत्ताविषयक गुन्हे उघडकीस आणले. तसेच गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास करताना चोरीस गेलेला माल हस्तगत केला होता. गहाळ मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग आणि सीईआयआर पोर्टलद्वारे हस्तगत केले आहेत.
आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुद्देमालाचे वाटप मूळ मालकांना करण्यात आले. मोबाईल फोन शोधण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्यातील कर्मचारी श्रीकांत साळवे, मंगेश काकुळदे, तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.
परत केलेल्या वस्तूंचा तपशील असा:
सोने, चांदीचे दागिने ४४.८ ग्रॅम: किंमत १ लाख २१ हजार
कार (१): किंमत ६ लाख ५० हजार
ऑटोरिक्षा (१): किंमत ८० हजार
दुचाकी: किंमत १ लाख २२ हजार
मोबाईल फोन (१००): किंमत १४ लाख २८ हजार ९०८