नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला टीव्हीवर कार्टून दाखविण्यास घरात घेऊन जात तिला मोबाइल देत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ११ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांच्या कोटनि ही शिक्षा ठोठावली. कैलास रामू कोकणी (रा. महालक्ष्मीनगर, अंबड मूळ रा. साक्री) असे आरोपीचे नाव आहे.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता महालक्ष्मीनगर, अंबड येथे राहणारा कैलास कोकणी याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या मुलीला कार्टून दाखविण्यास घरात घेऊन गेला. मुलीला मोबाइल खेळण्यास देत तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलीला त्रास झाल्यानंतर तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. अंबड पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक सविता गवांदे यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी सुरु होती. न्यायालयाने पंच, साक्षीदार आणि फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून ११ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.