नाशिक: घरफोडीप्रकरणी एकास ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा !

नाशिक | ३ मे २०२५:
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी २०२४ मध्ये घडलेल्या घरफोडीप्रकरणी न्यायालयाने एकास दोषी ठरवत ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून दुसऱ्याची निर्दोष मुक्त करण्यात आली आहे.

फिर्यादी मनोज कैलास आहिरे यांच्या तुळजाभवानी मंदिराजवळील, म्हाडा कॉलनी, अंबड येथील राहत्या घरात १३ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला होता. त्यांनी घरातील सोन्याची पोत, टीव्ही, दोन गॅस सिलिंडर आणि रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

तपासादरम्यान आरोपी अक्षय प्रकाश शिंदे (वय २९, रा. जगतापवाडी, सातपूर) आणि प्रदीप जगन्नाथ तुपे (वय ३०, रा. ठक्कर बाजार, नाशिक) यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. तपास अधिकारी पोलीस हवालदार के. बी. चव्हाण यांनी सखोल तपास करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले आणि दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याची सुनावणी नाशिक येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी क्रमांक श्रीमती एम. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार:

  • आरोपी अक्षय शिंदे यास भादंवि कलम ४५४ आणि ३८० अंतर्गत दोषी धरून ५ वर्षे सक्तमजुरी व ₹२५,००० दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
  • प्रदीप तुपे यास सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्यात आले.
  • फिर्यादी यांना नुकसान भरपाई म्हणून आरोपीने भरलेल्या दंडातून ₹२५,०००/- रक्कम अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता फिरोज शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. याशिवाय पोलीस नाईक जी. जी. बच्छाव, पो. कॉ. अमित साळवे आणि व्ही. ओ. घुले (अंबड पोलीस स्टेशन) यांनी केसच्या पाठपुराव्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

सदर प्रकरणात यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ-२ च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व संदीप मिटके, तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी तपासी पथकाचे आणि अभियोक्त्यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here