नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका मुख्यालयातील तब्बल १४ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक महानगरपालिकेने सुपर स्प्रेडर्सच्या चाचणीसाठी राबविलेल्या मोहिमेत मुख्यालयातच चक्क १४ कर्मचारी बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरात मार्च महिन्यापासूनच कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे.
दुकाने बाजारपेठांवर निर्बंध घातल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे अखेर प्रशासनाने सुपर स्प्रेडर्स शोधून त्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्यावरील भाजी विक्रेते, सुरक्षारक्षक, रिक्षाचालक अशांचाही चाचण्या करण्यात येत आहे.
त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा जनसंपर्कात येत असल्याने त्यांचीही चाचणी करण्याचे प्रशासनाने ठरविले. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यापासून महापालिकेच्या मुख्यालयात तपासणी सुरु करण्यात आली आहे. एकूण १९७ अधिकारी आणि कर्मचारी यांची तपासणी कार्यात आली, याच १४ कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती