नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एका भुखंडावर सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आठ दिवसांपूर्वी बांधलेली भिंत कोसळल्याची घटना सोमवारी घडली. चार मजूर या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारदानगर भागात एका बंगल्याचे बांधकाम सुरू होते. तळमजल्याच्या उभारणीसाठी या ठिकाणी खोल खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते. सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंत बांधत असताना एका बाजूची भिंत अचानकपणे खड्ड्यात कोसळली. यामुळे चार मजूर त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालील मजुरांना तातडीने बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोन मजुरांना मृत घोषित केले. गोकुळ संपत पोटिंदे (28), प्रभाकर काळू बोरसे (37,दोघे रा. दरी गाव) असे मृत मजुरांची नावं आहेत.
तसेच अनिल रामदास जाधव (30,रा.दरी) व संतोष तुकाराम दरोगे (45,रा.काळेनगर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.