नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या आठ दिवसांपासून तपोवन डेपोतील सिटीलिंक बससेवेच्या वाहकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप अखेर शुक्रवारी (ता.२२) मागे घेतला आहे. त्यामुळे सायंकाळपासून नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक आता पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. शनिवार (ता.२३) सकाळ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहेत.
गुरुवारी (ता.१४) वाहकांनी थकीत वेतन, पीएफ,ईएसआयसी व रजेचे पैसे अकाउंटला जमा करणे, इंक्रिमेंट, बोनस अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. शुक्रवारी (ता.२२) सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांची बैठक झाली.
या बैठकीत एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत संबंधित कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या तर उर्वरित ज्या मागण्या तत्काळ पूर्ण करणे शक्य नाही, अशा मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अखेर सिटीलिंक बससेवेच्या वाहकांनी पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.
वाहकांच्या संप मागे घेण्याच्या निर्णयामुळे आता नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक बस ९ दिवसांनंतर पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. तपोवन डेपो येथील बसेस सायंकाळीच सुरू होणार असल्यातरी शनिवार (ता.२३) सकाळ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहेत.