नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेने ‘एन कॅप’ निधीतून खरेदी केलेल्या यांत्रिकी झाडूद्वारे सोमवार (ता. ४) पासून शहराची झाडलोट होणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी घेण्यात आली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. इटलीहून यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईच्या बंदरामध्ये यंत्रे दाखल झाले. प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. आता चाचणी घेऊन यंत्रामार्फत रस्त्याची स्वच्छता केली जाणार आहे.
एका यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून चाळीस किलोमीटर प्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. यांत्रिकी झाडूसाठी प्रत्येकी २ कोटी ६ लाख रुपये असे एकूण चार यांत्रिकी झाडूंसाठी एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.
पाच वर्षांसाठी देखभाल- दुरुस्ती तसेच ऑपरेशन व मनुष्यबळ पुरवण्यासाठी मासिक पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च केला जाणार आहे पाच वर्षांसाठी २१ कोटी आठ लाख रुपये खर्च आला. महासभेने मंजुरी दिली आहे.
या रस्त्यांची होणार स्वच्छता: अशोकस्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोकस्तंभ, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका, महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरू गार्डन, शालीमार, पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा