वार बदलला; नाशिक शहरात आता दर आठवड्याला या दिवशी पाणी पुरवठा बंद !
नाशिक (प्रतिनिधी): धरण क्षेत्रासह शहरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरणात केवळ ४० दिवस पुरेल एवढाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिक शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
नाशिक शहरासाठी गंगापूर धरणातून पाणी उचलले जाते. सध्या पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर सतिश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १९०० एमसीएफटी जलसाठा शिल्लक असुन, त्यापैकी ८०० एमसीएफटी मृतसाठा आहे. ३०० एमसीएफटी पाणी रोटेशनसाठी, २०० एमसीएफटी पाणी एमआयडीसी व इतर वापरासाठी द्यावे लागते.
हा एकूण १३०० एमसीएफटी साठा वगळता उर्वरित ६०० एमसीएफटी जलसाठा हा नाशिककरांसाठी उपयोगात येणार आहे. दैनंदिन पाण्याचा वापर लक्षात घेता शिल्लक जलसाठा केवळ ४० दिवसच पुरेल एवढाच असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.