नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर धरणामधील साडेतीनशे दशलक्ष घनफूट पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अखरे कश्यपी धरणातून पाणी सोडण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी कश्यपीमध्ये २५ टक्के पाणी आरक्षित ठेवणे आणि महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे या अटीवर हा मार्ग निघाला.
जायकवाडीसाठी नाशिकमधील घरणांमधून ८.६ टीएमसी पाणी सोडल्यामुळे नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात ७०० दशलक्ष घनफूट पाण्याची कपात झाली. परिणामी, शहरासाठी ५३१४ दशलक्ष घनफूट आरक्षण देण्यात आले. त्यामुळे २० दशलक्ष घनफूट याप्रमाणे रोजच्या पाणी वापराचा विचार केला तर ३१ जुलैपर्यंत हे पाणी पुरवू शकणार नाही.
अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्ट फॉल भरून काढण्यासाठी कश्यपी धरणातील जवळपास ४२५ दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणामध्ये आणले जात होते. सद्यस्थितीत गंगापूर धरणाची पाणी पातळी ६०० मीटरपेक्षा खाली गेल्यास महापालिकेच्या पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी आणणे अवघड होणार होते. दरम्यान, पाणी सोडण्याची कारवाई झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी ३० टक्के पाणी राखून ठेवण्याची मागणी करत पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात कमी विसगनि पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
प्रकरण चिघळत असल्याचे बघून जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली. त्यात, कश्यपी धरण परिसरात नागरी वस्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर २५ टक्के पाणी आरक्षणाबाबत निर्णय घेऊन पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेणे, प्रकल्पग्रस्तांना दाखले व पुनर्वसनाचे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिकेचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.