नाशिक (प्रतिनिधी): अवकाळी पावसामुळे १३२ के. व्ही. सातपूर फिडर सबस्टेशनमध्ये बिघाड झाला असून, महावितरणकडून शुक्रवारी (दि.४ एप्रिल २०२५) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गंगापूर धरण येथून होणारा पाणीपुरवठा पंपिंग करणे शक्य होणार नसल्याने शहराचा सकाळच्या वेळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, सायंकाळी कमी दाबाने पुरवठा होईल.
गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ के.व्ही.एच.टी. वीजपुरवठा घेण्यात आलेला असन, सदर पंपिंगद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड
जलशुद्धीकरण केंद्र यांना रॉ. वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. परंतु अवकाळी पावसामुळे १३२ के. व्ही. सातपूर फिडर सबस्टेशनमध्ये बिघाड होऊन डिस्क इन्शुलेटर आणि पिन इन्शुलेटर बर्स्ट झालेले आहेत. एचटी कन्डक्टर तुटलेले आढळून आले असल्याने सप्लाय बंद ठेवण्यात आलेला होता. या कामांच्या दुरुस्ती कामाकरीता विद्युत पुरवठा बंद ठेवण्याबाबत महावितरणने कळवले आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. ४) गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे होणारा वीजपुरवठा बंद राहणार आहे. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र, बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रावरून सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहील.