नाशिक (प्रतिनिधी): शनिवारी रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यावेळी गंगापूर धरणाच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नाशिक शहराच्या बहुतांश भागांत रविवारी (दि. २०) पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दुसरीकडे, महावितरणने सकाळी ६:४५ वाजता वीजपुरवठा सुरळीत केला होता. मात्र, महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमध्ये मोटार जळाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असा दावा केला आहे. दरम्यान, सोमवारी (दि. २१) पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शहराच्या बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. गंगापूर धरण येथील पंपिंग स्टेशन येथे ३३ के. व्ही. एक्स्प्रेस फिडर असून त्याचा पुरवठा रात्री खंडित झाला. हा वीजपुरवठा रविवारी सकाळी ६:४५ वाजता सुरळीत झाला. मात्र, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता आणि तो सुरळीत करण्याचे कामदेखील सुरू होते. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. सोमवारी (दि. २१) पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने विस्कळीत पाणीपुरवठ्याचे खापर महावितरणवर फोडले असताना महावितरणनेदेखील महापालिकाच जबाबदार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. महावितरणने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे: “गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील १ हजार एचपीची मोटर जळाल्यामुळे व महापालिकेच्या सबस्टेशनमधे विद्युत जंप्स तुटल्याने त्यांची दुरुस्ती महापालिकामार्फत करण्यात आली व या सर्व तांत्रिक दोषामुळे सुध्दा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून महावितरणचा थेट यांचेशी संबंध नाही- महावितरण गंगापूर उपविभाग, नाशिक”