नाशिक | दि. ५ जानेवारी २०२५: महानगरपालिका क्षेत्रातील सातपूर विभागात १२०० मि.मी. व्यासाच्या कच्च्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला झालेल्या मोठ्या गळतीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ही गळती थांबविण्याचे दुरुस्ती कार्य रविवारी (दि. ४) उशिरापर्यंत सुरू होते. परिणामी, शहरातील सर्व भागांतील पाणीपुरवठा सोमवार (दि. ५) दुपारपर्यंत हळूहळू सुरळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.
मुक्त विद्यापीठ गेट परिसरात जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून, रविवारी शहरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता. सोमवारी मात्र काही भागांत कमी दाबाने पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक रोड आणि सिडकोतील पवननगर जलकुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. सकाळी व सायंकाळी पाणी उपलब्ध न झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मुक्त विद्यापीठ परिसरातील दुरुस्ती कामास काहीसा विलंब होण्याची शक्यता असून, ही अत्यावश्यक व तातडीची कारवाई नागरिकांच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे मनपाने सांगितले आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा विभाग) रवींद्र धारणकर यांनी केले आहे.
![]()


