
नाशिक। दि. ३१ मार्च २०२६: नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील प्राधान्य प्रकल्प तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आवश्यक दुरुस्ती आणि जोडणी कामांसाठी शनिवार (दि. ४ एप्रिल) आणि रविवार (दि. ५ एप्रिल) या दोन दिवस संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, या कालावधीत जलवाहिन्यांचे क्रॉस कनेक्शन, गळती दुरुस्ती, व्हॉल्व बदलणे आणि जलशुद्धीकरण केंद्रांवरील देखभाल अशी विविध कामे एकाच वेळी पार पडणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागनिहाय कामांचा आढावा:
- नाशिक पूर्व: कलानगर जलकुंभाशी ५०० मिमी गुरुत्ववाहिनी जोडणी आणि गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरील कामे; अंदाजे २४ तासांचा कालावधी.
- नाशिक पश्चिम: त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे ३०० मिमी पाइपलाईन गळती दुरुस्ती व पी अँड टी कॉलनी येथे एअर व्हॉल्व बदल; सुमारे १२ तास.
- नाशिकरोड विभाग: गांधीनगर व नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रांवर ९०० मिमी व १२०० मिमी लाईनचे क्रॉस कनेक्शन, पंप इनलेट बदल आणि फ्लो मीटर बसविणे; अंदाजे ३६ तास.
- पंचवटी: पेठ रोड परिसरात ६०० मिमी लाईनचे क्रॉस कनेक्शन, समर्थनगर जलकुंभ जोडणी आणि कुसुमाग्रज गार्डन परिसरात गळती दुरुस्ती; सुमारे १८ तास.
- सातपूर: १२०० मिमी व ५०० मिमी पीएससी पाइपलाईनवरील विविध ठिकाणी गळती दुरुस्तीची पाच कामे; अंदाजे १२ तास.
- नवीन नाशिक: महाराजा हॉटेल, पाथरडी फाटा, इंद्रनगरी, गोविंदनगर, भवानी माता टाकी आदी भागांत गळती दुरुस्ती, व्हॉल्व बसविणे व क्रॉस कनेक्शन; एकूण नऊ कामे, सुमारे १८ तास.
१५ व्या वित्त आयोगांतर्गत कामे:
गंगापूर धरण ते बारा बंगला दरम्यान १८०० मिमी पाइपलाइन टाकणे आणि १७०० मिमी लाईनचे क्रॉस कनेक्शन अशी मोठी कामे हाती घेण्यात येणार असून यासाठी सुमारे ४८ तासांचा कालावधी अपेक्षित आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, शनिवार व रविवार पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होईल.
दरम्यान, या कालावधीत संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
![]()

