नाशिक शहरातील संभाव्य पाणी कपातीबाबत महत्वाची बातमी..
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर धरण समूहात अवघे २७ टक्के तर मुकणे धरणात अवघा २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पुढील आठवड्यापर्यंत पावसाने दमदार हजेरी न लावल्यास पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपातीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाणी कपात फेटाळली होती मात्र आता धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्यामुळे प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होत असून १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या २९० दिवसांसाठी साडेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. यात गंगापूर धरण समूहातून ३८००, दारणा धरणातून ४०० तर मुकणे धरणातून १३०० दशलक्ष घनफूट पाणी याप्रमाणे आरक्षण असून १ जुलैपर्यंत गंगापूर धरणातून ३६१७ तर मुकणे धरणातून ११३८ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे.
दारणा धरणात आरक्षित असलेल्या एकुण पाण्यापैकी आतापर्यंत अवघे १६.७१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. अळ्यायुक्त पाणी येत असल्यामुळे दारणातून पपींग बंद झाले आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिकरोड साठी पाणीपुरवठा केला जात असून पालिकेकडे सध्याचा वापर बघता १५ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. हेच पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवायचे असेल तर पाणी कपातीचा काही पर्यायावर विचार करावा लागणार आहे. आठवड्यातून एकदा पूर्णपणे पाणी बंद किंवा सध्याच्या प्रतिदिन पाणी पुरवठ्याच्या वेळेत काही कपात करून बचत केली जाऊ शकते.
यासंदर्भात महासभेने यापूर्वी प्रस्ताव फेटाळला आहे मात्र आता जूनमध्ये समाधानकारक पाऊस नसल्यामुळे तसेच जुलैचा पहिला आठवडा कोरडा जाण्याची भीती लक्षात घेत महापालिकेने पाणी कपातीच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे.