नाशिक(प्रतिनिधी): आज दि.२०/०५/२०२० रोजी नाशिक शहरामध्ये कोरोनाचे ४ नवीन रुग्ण आढळून आले परंतु हे ४ ही रुग्ण नाशिक शहरातील नाहीत. एक रुग्ण निमोण तालुका संगमनेर दुसरा जळगाव व इतर दोन मुंबई येथील आहेत. सदर रुग्ण नाशिक शहरामध्ये विविध उपचार घेण्यासाठी आलेले होते आणि उपचार घेण्याच्या आधी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आलेली आहे.
त्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यातील ८४ वर्षांचे गृहस्थ दिनांक १६ मे २०२० रोजी मुंबईहुन नाशिकला आले होते.त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो म्हणून लगेचच व्होकार्ड हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यांचा तपासणी नमुना देण्यात आलेला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे.
पंचवटी येथील मुलाकडे मुंबई येथून आलेले गृहस्थ हृदयाचा त्रास होतो म्हणून अशोका मेडिकल हॉस्पिटल मध्ये भरती झाले होते भरतीवेळी त्यांचा तपासणी नमुना घेण्यात आलेला होता परंतु दोन तासाने लगेच त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी फक्त कुटुंबीयांसमवेतच पार पडलेला आहे.
जळगाव व निमोण,ता.संगमनेर येथील आलेल्या व्यक्ती सदर ठिकाणाहून थेट रुग्णालयात उपचाराकरिता भरती झालेले होते त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे आज नाशिक शहरांमधील कोणताही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह नाही म्हणून कुठलेही नवीन प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आलेले नाही. आजपावेतो नाशिक शहरामध्ये एकूण ३५ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आलेली होती त्यापैकी १३ प्रतिबंधित क्षेत्र कार्यकाल संपल्याने व नवीन रुग्ण आढळून न आल्याने रद्द करण्यात आलेली आहेत. आज मितीस एकूण २२ प्रतिबंधित क्षेत्रे नाशिक शहरांमध्ये कार्यान्वित आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शहरांमधील सर्व झोपडपट्ट्या व स्लम भागामध्ये आरोग्य पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे.
या सर्वेक्षणामध्ये सर्दी,ताप, खोकला असे लक्षण असलेले रुग्ण शोधण्यात येत असून ते आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका यांचे वतीने एकूण २०० पथके तयार करण्यात आलेले असून त्यांचे मार्फत सुमारे ६९ हजार घरांमधील ३ लक्ष नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे.