नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण कोरोना कक्ष येथे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन रुग्णांना तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा बाबतची पाहणी केली व तेथील कक्षात संपूर्ण पी.पी.ई. किट घालून त्याठिकाणी जाऊन रुग्णांशी संवाद साधला.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संशयित अथवा कोरोना बाधीत रुग्णांना मनपाच्या वतीने योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही अशी तक्रार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल व समाज कल्याण येथील कोरोना कक्ष येथे अचानक भेट दिली. यावेळी डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे असणाऱ्या कोरोना बाधित व कोरोना संशयित रुग्णांशी तेथील कक्षात संपूर्ण पी.पी.किट घालून त्याठिकाणी जाऊन रुग्णांशी संवाद साधला. संवाद साधून त्यांना देण्यात येणारा काढा,गरम पाणी, जेवणाची व्यवस्था याबाबत रुग्णांची चर्चा करून त्याबाबत खात्री करण्यात आली. तसेच रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत की नाही याबाबतची खात्री केली. तसेच या रुग्णालयात औषधांचा पुरवठा, कर्मचाऱ्यांची असणारी व्यवस्था याबाबत पाहणी करण्यात आली.
यावेळी डॉ नितीन रावते यांनी या रुग्णालयातील व्यवस्थे विषयी माहिती दिली. तसेच समाजकल्याण कोरोना कक्ष येथे जेवणाची व्यवस्थेबाबत पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी दिले जाणारे जेवण याबाबतची तपासणी करून केटरिंग वाल्यांशी चर्चा करण्यात आली. रुग्णांना पोटभर जेवण देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्या समवेत कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयाचे डॉ.नितीन रावते,समाज कल्याण कोरोना कक्ष येथील डॉ. गरुड हे उपस्थित होते.