नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुने नाशिक येथून मुख्य मिरवणुकीचे आयोजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१४) दुपारी बारापासून मिरवणूक मार्गात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आदेश जारी केले आहेत. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीला बंदी केली आहे.
मिरवणुकीला राजवाडा (भद्रकाली) येथून सुरुवात होणार असून, वाकडी बारव (चौक मंडई), कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, सांगली बँक चौक सिग्नल, टिळकपथ, नेहरू गार्डन, शालिमारमार्गे शिवाजीरोडने सीबीएस जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप होणार आहे. हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रविवारी (ता.१४) दुपारी बारापासून बंद राहणार आहे.
असे असतील पर्यायी मार्ग:
चौक मंडईतून सारडा सर्कलमार्गे महात्मा फुले चौकी, अमरधाम मार्गे पंचवटीकडे वाहतूक करता येणार आहे. तसेच सिटी बसला नाशिकरोड किंवा सिडकोच्या दिशेने जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस व इतर वाहनांना दिंडोरी नाक्यावरून पेठ फाटा सिग्नल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल मार्गेसीबीएस, गडकरी चौक सिग्नलमार्गे सिडको, नाशिक रोडच्या दिशेने जाता येणार आहे.
पाथर्डी फाट्यावरील वाहतूक मार्गात बदल:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) पाथर्डी फाटा भागातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. पोलिस विभागाच्या वाहतूक विभागाने यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार या भागातून अवजड वाहनांना प्रवेश बंद केला असून, सायंकाळच्या वेळी मिरवणूक मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर परिसरात विविध ठिकाणी मिरवणूक काढली जाणार आहे. पाथर्डी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा असल्याने येथे मोठा जनसमुदाय जमणार आहे. इंदिरानगर भागात जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर या भागात सायंकाळी पाचपासून मिरवणूक संपेपर्यंतच्या वेळेत वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
अवजड वाहनांसाठी हे मार्ग राहतील बंद:
गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा, कलानगर, फेम सिग्नल हा मार्ग दुहेरी बाजूंनी अवजड वाहनांसाठी बंद राहील. तसेच पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरुन अंबड, सातपूर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद राहील. अंबडच्या दिशेने नम्रता पेट्रोल पंप ते पाथर्डी फाट्यावर येणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद राहील. अवजड वाहनांनी वाहतुकीसाठी उड्डाणपुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.