नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेली चार वर्ष इंदिरानगर, वडाळा आणि पाथर्डी भागातून सुरू असलेल्या अवजड वाहतूक बंद आंदोलनाला काही प्रमाणात का असेना आज यश मिळाले. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मंगळवारी (ता.२३) अधिसूचना काढत दहा दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर या भागातून होणारी अवजड वाहतूक गुरुवार दि. २५ एप्रिल ते ४ मे दरम्यान सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत बंद करत असल्याचे जाहीर केले आहे.
यामुळे अवजड वाहतुकविरोधी कृती समितीच्या सदस्यांसह इंदिरानगरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे. एक फेब्रुवारी २०२० ला तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिसूचना काढत नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक द्वारकेऐवजी फेम सिग्नलमार्गे वडाळागाव, इंदिरानगर, पाथर्डी या मार्गे वळवली होती. तर मुंबईकडून पुण्याला जाणारी वाहतूकही त्याच मार्गाने वळवली होती.
मात्र त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही वाहतूक चार वर्ष सुरूच होती. अवजड वाहनांमुळे झालेल्या ४१ अपघातांत काहींना जीव गमवावा लागला तर काहींच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले. या वाहतुकीविरोधात लोकप्रतिनिधी, आमदार, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक यांनी अनेकवेळा अर्ज देत आंदोलन केले. मात्र तरीही वाहतूक सुरू होती.
गत आठवड्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी (ता.२२) कृती समितीतर्फे खांडवी यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. त्यावर तत्काळ कार्यवाही करत २५ एप्रिल ते ४ मे या दहा दिवसांसाठी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करत असल्याची अधिसूचना काढली आहे.
अशी होईल वाहतूक:
पुण्याकडून फेममार्गे इंदिरानगरमध्ये येणारी अवजड वाहने आता द्वारका सर्कल येथील रॅम्पवरून उड्डाणपुलमार्गे मुंबईकडे मार्गस्थ होतील. तर पुण्याकडे जाणारी वाहने द्वारका मार्गेच जातील. रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत मात्र मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाथर्डी फाटा, इंदिरानगर वडाळामार्गे जाऊ शकतील. दहा दिवस वाहतुकीतील हा बदल लक्षात घेऊन त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.