नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात सालाबादप्रमाणे श्री रामरथ व श्री गरुडरथ मिरवणूक पंचवटीतून काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.१९) दुपारी १ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक पर्यायी रस्त्याने मार्गस्थ होणार आहे.
पंचवटीमधील काळाराम मंदिरापासून विविध रस्त्यांवर वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून जारी करण्यात आली आहे.
रामरथ मिरवणूक श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून नाग चौक लक्ष्मण झुला पूल, काट्यामारुती चौक गणेशवाडीरोड-महात्मा फुले पुतळा गणेशवाडी आयुर्वेदिक रुग्णालय, थेट गौरी पटांगण-म्हसोबा पटांगण कपालेश्वर मंदिर-रामकुंड-परशुराम पुरीया रोडवरून मालवीय चौक शनिचौक-काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा ह्या मार्गावरून काढण्यात येणार आहे.
गरुड रथसुद्धा रामरथासोबत निघत असतो. काळाराम मंदिर-नागचौक- लक्ष्मण झुला पूल- जुना आडगाव नाका-काट्यामारुती चौकातून गणेशवाडी आयुर्वेदिक रुग्णालयमार्गे गौरी पटांगणातून दिल्ली दरवाजा मेनरोडवरून सराफबाजार-कपूरथळा मैदान-म्हसोबा पटांगणात रामरथासोबत येऊन काळाराम मंदिर पूर्व दरवाजा ह्या मार्गावरून पुढे जाणार आहेत. यामुळे या मार्गावर दुपारी २ वाजेपासून मिरवणुका संपेपर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग असा:
👉 काट्यामारुती चौकाकडून गणेशवाडीमार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने थेट पंचवटी कारंजा- मालेगाव स्टॅन्डवरून रविवार कारंजाकडे मार्गस्थ होत ये-जा करतील.
👉 काट्यामारुती चौकातून संतोष टी पॉइंटवरून थेट वाहने द्वारका सर्कलकडे रवाना होऊन पुढे सारडा सर्कलमार्गे इतरत्र जातील.