नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार आज, गुरुवारी (दि. २८) साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दुपारी १२ वाजता जुने नाशिकमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
शिवजयंती मिरवणुकीला जुने नाशिकमधील वाकडी बारव येथून दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे चौकमंडई, दादासाहेब फाळके रोड, पुढे मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नलवरून मेहेर चौकातून अशोकस्तंभ, पंचवटी कारंजा चौकातून पुढे मालवीय चौकमार्गे रामकुंडावर पोहोचणार आहे. यामुळे या मार्गावर मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
तसेच पंचवटी एसटी आगार व निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेससुद्धा आडगावनाका कन्नमावर पूलमार्गे द्वारका सर्कलकडून नाशिकरोडसह शहरातील अन्य भागात प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करतील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका कन्नमवार पुलावरून पुढे जातील. रविवारकारंजा, अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या सिटी लिंकच्या शहर बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.