महत्वाची बातमी: नाशिक शहरात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने वाहतूक मार्गात बदल
नाशिक (प्रतिनिधी): तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिक जिल्ह्यासह बाहेरगावचे भाविकही त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सीबीएस येथून बसेसने जात असतात. शनिवार, रविवार आणि सोमवारी आलेला १५ ऑगस्ट अशा सलग सुट्यांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील वाहतूक मार्गातील बदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे.
सीबीएस परिसरातून वाहतूक मार्गांतील बदल अन् पर्यायी मार्ग असे…
सीबीएस येथे होणारी गर्दी आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शरणपूररोडवरून टिळकवाडी चौफुलीपर्यंत म्हणजेच राजीव गांधी भवनकडे जाणाऱ्या रोडवर बसेस व शहर बसेस वगळता सर्व वाहनांना प्रवेश बंद.
सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नलकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी सीबीएस चौकातूनच मोडक सिग्नलकडे माझदा हॉटेलवरून राजदूत हॉटेलमार्गे किंवा सीबीएस सिग्नलवरून मेहर सिग्नलमार्गे अशोकस्तंभ व तिथून गंगापूर रोडवरून वाहने वळविण्यात आली आहेत.
शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे बसेस वगळून सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग म्हणून टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएसकडे जाणारी वाहतूक ही टिळकवाडी सिग्नलवरून जलतरण तलावाकडून त्र्यंबकरोडवरून मोडक सिग्नल, हॉटेल माझदावरून सीबीएसकडे वळविली जातील.
दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे टिळकवाडी सिग्नलवरून पंडित कॉलनीमार्गे गंगापूररोड आणि पुढे अशोकस्तंभमार्गे पुढे इतरत्र वाहने वळविण्यात आली आहेत.
वाहनांसासाठी प्रवेश बंद असलेल्या मार्गांवरून मात्र, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच पोलिसांकरिता वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790