नाशिक। दि. २८ जुलै २०२५: श्रावणमासानिमित्त प्रत्येक सोमवार व शनिवारी पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. कपालेश्वर मंदिर, रामकुंड परिसराकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून काढण्यात आली आहे.
श्रावण महिन्यानिमित्त पंचवटीतील मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी उसळते. विशेषतः शनिवारी व सोमवारी गर्दीचा उच्चांक पहावयास मिळतो. तसेच रामकुंडावरदेखील स्नानासाठी भाविकांची गर्दी होते. यामुळे वाहतुक कोंडी होऊ नये व भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने शहर वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतुक अधिसूचना काढली आहे.
येत्या २३ ऑगस्टपर्यंत ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. श्रावणाच्या प्रत्येक शनिवारी व सोमवारी वाहतुक मार्गात बदल करण्यात येणार असून रामकुंड परिसरात वाहनांना मज्जाव करण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहे. यानुसार सोमवारी (दि.२८) सकाळी सहा वाजेपासूनच वाहतुक अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. ही अधिसूचना आपत्कालीन सेवेतील वाहने, पोलिस वाहनांना लागू राहणार नाही.
👉 येथून सोमवारी, शनिवारी असणार प्रवेश बंद:
मालेगाव स्टॅण्ड, खांदवे सभागृह, सरदार चौक, ढिकले वाचनालय या चारही ठिकाणांकडून रामकुंड-कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रत्येक सोमवारी व शनिवारी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. येथे पोलिसांचे बॅरिकेडिंग राहणार असून वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणार आहे.