नाशिक। दि. २४ जुलै २०२५: नाशिक शहरातील वाहतूक कोंडीसाठी वारंवार चर्चेत असलेले व्दारका सर्कलसाठी आता स्वतंत्र ट्रॅफिक युनिट स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या पुढाकाराने ही महत्त्वाची सुधारणा अंमलात आणली जात आहे.
व्दारका सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्कल काढल्यानंतरही सुटलेला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी अधिक प्रभावी वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी येथे फक्त दोन शिफ्टमध्ये एक अधिकारी आणि नऊ अंमलदार नियुक्त होते. मात्र, प्रचंड रहदारीच्या पार्श्वभूमीवर हे मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याचे स्पष्ट झाले होते.
नवीन युनिटमध्ये आता पोलीस निरीक्षक-१, सहायक पोलीस निरीक्षक-१, पोलीस उपनिरीक्षक-२ आणि वाहतूक अंमलदार-३० अशा एकूण ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे युनिट तीन शिफ्टमध्ये काम करणार असून, प्रत्येक शिफ्टमध्ये १ अधिकारी आणि १० अंमलदार वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळतील.
‘व्दारका’ युनिटचे प्रभारी म्हणून पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक यतिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पठाण यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सर्कलवरील कामकाजाच्या तपासणीसाठी दोन स्वतंत्र पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सर्व अधिकारी व अंमलदारांना वाहतूक नियमनाच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, व्दारका सर्कलवरील ही सुधारणा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक मोलाचे पाऊल ठरणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने हे युनिट एक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.