नाशिक। दि. १९ ऑक्टोबर २०२५: चार रस्ते एकत्र येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने सिडकोमधून अंबड एमआयडीसीमध्ये जाणारा रस्ता (फ्रेश अप बेकरी) शहर वाहतूक शाखेकडून एकेरी मार्ग करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून (दि.२०) हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. यामुळे या रस्त्यावरून आता केवळ एमआयडीसीमधून सिडकोकडे येणारी वाहतूक सुरू राहणार आहे.
वाहतूक शाखा युनिट-३ अंतर्गत येणारा सिडको हॉस्पिटल चौकापासून अंबड एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक होत होती; सिडको हॉस्पिटलकडून अंबड एमआयडीसीकडे जाणारी सर्व वाहने हॉस्पिटलपासून उजवीकडे वळण घेऊन बिको कंपनी मार्गे पुढे जातील. या चौकातून पुढे अंबड एमआयडीसीकडे जाण्यासाठी अरुंद रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
मात्र आता एमआयडीसीमधून सिडको-पाथर्डी फाट्याकडे येणाऱ्या वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होणार आहे. सिडको, पाथर्डीफाटा बाजूकडून अंबड एमआयडीमध्ये जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता बंद केला आहे, अशी अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरिथिका सी. एम यांनी जारी केली आहे.
![]()

