नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आठवडाभरापासून नाशिक शहराचे कमाल-किमान तापमानाचा आलेख चढता असून, बुधवारी (दि.२७) शहरात कमाल तापमान थेट ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. एप्रिल, मेमध्ये उन्हाची जेवढी तीव्रता अनुभवयास येते, त्याप्रमाणे बुधवारी नाशिककरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. दुपारपासून रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला पाहावयास मिळाला. यामुळे नाशिकलाही उष्मालाटेचा धोका निर्माण होऊ लागला आहे.
मागील तीन वर्षांपेक्षा यावर्षीचा उन्हाळा नागरिकांना अधिक प्रखरपणे जाणवत आहे. उन्हाळ्याची पुढील दोन महिने अजून जायची आहेत. मात्र, शहरासह जिल्हा आताच तापला आहे. शासनाने जाहीर केलेल्या उष्मालाटेच्या कृती आराखड्यानुसार नाशिकसाठी उच्चतम कमाल तापमान पातळी ३९.५ दर्शविण्यात आली आहे. बुधवारी ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेल्यामुळे उष्मालाटेचे संकट शहरावर निर्माण होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील दोन दिवस जर असाच पारा चढता राहिला, तर नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाकडून उष्णतेची लाट जाहीर केली जाऊ शकते.
दोन दिवसांत ४ अंशांनी वाढले तापमान:
नाशिक शहराच्या कमाल तापमानात मागील दोन दिवसांत तीन ते चार अंशांनी वाढ झाली, तर किमान तापमानातसुद्धा एका दिवसात थेट २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे. किमान तापमान वाढल्यामुळे रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून, नाशिककर घामाघूम होत आहे.