नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात वातावरणात निम्न स्तरावरील द्रोणिका रेषा ही दक्षिण विदर्भ ते दक्षिण कर्नाटकापर्यंत विस्तारली असून ती मराठवाड्यातून जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तापमानाने चाळिशी पार केली होती. शहरात उच्चांकी ४०.६ अंश तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर अन् नांदेडमध्ये गुरुवारी (दि. १८) उष्णतेची लाट राहील. काही ठिकाणी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
आगामी दोन दिवस मध्य महाराष्ट्रात जिल्ह्यात रात्री उकाडा जाणवणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे व काही ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकमधील उष्णतेची लाट कायम राहील, राजस्थान व सौराष्ट्राकडून येणारे उष्ण वारे आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उष्णतेची लाट तयार झाली आहे. बुधवारी कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊन होते. हेच हवामान दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. या लाटेसोबत विजांचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह मध्यम पाऊस होणार असल्याने ठिकठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.