अखेर ठरलं तर.. नाशिक शहरातील शाळा या दिवसापासून उघडणार !
नाशिक (प्रतिनिधी): पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार होत्या,
मात्र करोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय दहा दिवस पुढे ढकलण्यात आला होता.
आता मात्र, शाळा सुरु करण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याचे निर्वाळा आरोग्य मंत्र्यांनी नुकताच दिला होता….
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 29 नोव्हेंबर,2021 च्या परिपत्रकान्वये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शहरी भागातील शाळा सुरु करणेसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 10 ऑगस्ट 2021 व दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता महापालिका आयुक्तयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. नाशिक शहरातील शाळा दिनांक 10 डिसेंबर,2021 नंतर सुरु करणेबाबत, शाळा सुरु करणेपूर्वी नाशिक शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकडून शाळा पूर्वतयारी अहवाल (गोषवारा) मागविण्यात आलेला आहे.
नाशिक शहरात इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग असलेल्या एकूण 504 शाळांमध्ये 1,85,279 विद्यार्थी शिक्षण घेत असून 60 टक्के पालकांनी शाळा सुरु करणेस संमती दर्शविलेली आहे. महापालिका आयुक्त नाशिक यांच्या दिनांक 09/12/2021 च्या मान्यतेनुसार व शासनाकडील परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्यासाठी मागर्दशक सूचनांची अमंलबजावणी करुन नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वीचे वर्ग दिनांक 13 डिसेंबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.