नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाइन शिष्यवृत्ती देण्याचे आमिष देत २.७५ लाखाला ऑनलाइन गंडा घालणाऱ्या संशयिताला सायबर पोलिसांनी अटक केली. नीलेश क्लिफोर्ड फर्नांडिस (रा. मालाड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत ४ जूनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयितांनी एका पालकाला सर्व शिक्षण सोल्युशन एलएलपी या कंपनीमधून विद्या नामक युवतीने मुलांना शाळेतील अभ्यासक्रमात कार्टुन थ्रू सोप्या भाषेत पेनड्राइव्ह व सीडीत स्टोअर करून दिला जाईल. त्यासाठी १२ हजार रुपये फी घेतली जाईल असे सांगितल्याने तक्रारदाराने क्रेडिट कार्डद्वारे पैसे पाठवले.
याचा फायदा घेत कंपनीकडून मुलाला तीन लाख ८२ हजारांची शिष्यवृत्ती मंजूर केल्याचे सांगत या रकमेसाठी प्रोसेसिंग फीच्या नावे दोन लाख ७२ हजार रुपये भरण्यास सांगत शिष्यवृत्ती न देता फसवणूक केली. याबाबत तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी संशयिताला मालाडमध्ये अटक केली. निरीक्षक देवराज बोरसे, दानिश मन्सुरी, किरण जाधव, योगेश राऊत, पराग गायकवाड, सविता गावले यांच्या पथकाने या कंपनीच्या काॅल सेंटरवर छापा टाकून संशयित चालकाला अटक केली.