नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे नाशिककरांकडून स्वागत होते आहे.
‘एक्स’ या ट्विटर हॅण्डलप्रमाणेच, व्हॉटसॲप क्रमांकावरून आयुक्तांनी सूचना व अभिप्रायासाठी आवाहन केले असता, त्यास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
गेल्या ३६ तासांमध्ये सुमारे अडीचशेच्या वर व्हॉटसॲप क्रमांकावर सूचनांचा पाऊस पडला आहे. त्या सूचनांचीही पोलीस ठाणेनिहाय अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे.
शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यापासून सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर नाशिक पोलीस ‘ॲक्टिव्ह’ झाले आहे. एक्स ट्विटर हॅण्डलवरील नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे फॉलोअर्स वाढले आहेत.
त्यावर सातत्याने सूचना मिळू लागताच त्याची अंमलबजावणीही सुरू केली गेली. परंतु त्यास मर्यादा असल्याने आयुक्तांनी ९९२३३ २३३११ हा व्हॉटसॲप क्रमांक नाशिककरांना सूचना व अभिप्राय देण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
आयुक्तांच्या या व्हॉटसॲप क्रमांकाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या ३६ तासांमध्ये यावर सुमारे अडीचशेपेक्षाही अधिक अभिप्राय व सूचना नाशिककरांनी शहर पोलिसांना केल्या आहेत.
यात प्रामुख्याने नाशिककरांना व्यक्त होण्यासाठी संधी दिल्याने नागरिकांनी पोलिसांना शुभेच्छा देत स्वागत केले आहे.
याशिवाय, शहरातील वाहतूकीबाबत सूचना, पोलीस ठाणेनिहाय काही तक्रारी वा सूचना, तसेच महिला सुरक्षा, गस्ती, टवाळखोरांवर कारवाईच्या सूचना केल्या आहेत.
सूचनांची दखल:
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वत: या व्हॉटसॲप क्रमांकावरील सूचना व अभिप्रायांचे निरीक्षण करीत आहेत. यात करण्यात आलेल्या सूचनांचे गांभीर्याने दखल घेतली जाऊन संबंधित पोलीस ठाण्यांना वा विभागांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
असा आहे प्रतिसाद (कंसात संख्या):
स्वागत वा शुभेच्छा – १४३, वाहतूक – ३५, पोलीस ठाण्यांशी संबंधित -३०, अन्य स्वरुपाच्या – १५, अंमलीपदार्थाबाबत – ५, महिला सुरक्षा – ३, ध्वनीप्रदूषण – २, पोलीस गस्ती – २, रस्त्यावरील उपद्रव – १
“नाशिककरांनी ९९२३३ २३३११ या व्हॉटसॲप क्रमांकावर अधिकाधिक शहर पोलिसिंगबाबत सूचना कराव्यात. आपल्या सूचनांचे तत्काळ अंमल करण्यास शहर पोलीस कटिबद्ध आहे.” – संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक