
नाशिक (प्रतिनिधी): पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.३) महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन साजरा करण्यात आला. पोलिस परेड ग्राउंडवर सकाळी ७:४५ वाजता यानिमित्त पोलिस परेड तसेच आपत्कालीन परिस्थितीशी कसा सामना करायचा, याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शस्त्र प्रर्दशनही आयोजित करण्यात आले.
पोलिस मुख्यालयातील पोलिस परेड ग्राऊंडवर आयोजन करण्यात आले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मानवंदना स्वीकारली. नागरी वस्तीवर किंवा सार्वजनिक जागेवर हल्ला झाल्यावर तो कसा परतवायचा? याचे प्रात्यक्षिक कमांडोंनी दाखविले. कार्यक्रमास पोलिस दलातील इतर अधिकारी, विविध शाळा, महाविद्यालयांचे ८५० विद्यार्थी उपस्थित होते.
परेड कमांडरची भूमिका सहा. पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी बजावली. परेडमध्ये पोलिस दलातील सर्व अधिकारी, अंमलदार, महिला अंमलदार, दामिनी पथक, शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. परेड संचालनानंतर जलद प्रतिसाद पथकाने अतिरेक्यांच्या तावडीतून पळवून नेलेल्या बसमधून पिडितांची सुटका केल्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर बी.डी.डी. एस. पथकाने अल्फा या श्वानाच्या मदतीने स्फोटक शोधण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी पोलिस दलाचा इतिहास व पोलिसांपुढील आव्हाने सांगितले. समारोप कार्यक्रमावेळी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहा. पोलिस आयुक्त संदीप मिटके आदी उपस्थित होते.
![]()


