नाशिक | दि. २७ ऑक्टोबर २०२५: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांवर नाशिक शहर पोलिसांनी सुरू केलेल्या कडक कारवाईचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक व सामाजिक संघटनांनी पोलिस दलाच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी फलक, पोस्टर्स आणि बॅनर्स लावले आहेत. तथापि, नाशिक शहर पोलिसांनी आता नागरिकांना हे समर्थनात्मक होर्डिंग्ज काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक शहर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसा पासून नाशिक शहर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नाशिक शहर सुरक्षित ठेवण्यासाठी टवाळखोर इसम, गुंड यांचे विरूध्द विविध कार्यवाही व इतर उपाययोजना अविरतपणे करीत असताना, नाशिक मधील विविध नागरीक, संघटना यांच्या कडून नाशिक शहर पोलीस दलाच्या प्रति समर्थन दर्शविण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. पोलीस दलाच्या कार्याची जनतेकडून होत असलेली ही सकारात्मक दखल नाशिक शहर पोलीस दलासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.”
नाशिक पोलिसांनी शहरातील विविध घटकांकडून व्यक्त झालेल्या सकारात्मक भावनांबद्दल आभार व्यक्त करत, “सदरचे फलक / बॅनर्स संबंधीत नागरीक, संघटना यांनी काढून घेण्यात यावेत. नाशिक शहरातील विविध घटकातील या सकारात्मक भावनाबद्दल नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने आम्ही कृतज्ञता आणि आभार व्यक्त करीत आहोत” असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
![]()

