
नाशिक। दि. ४ जानेवारी २०२६: पोलिस रेझिंग डेच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याने उल्लेखनीय उपक्रम राबवत विविध गुन्ह्यांतील तब्बल २ कोटी ९९ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत केला. नववर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या दिलासादायक भेटीमुळे नागरिकांना सुखद धक्का बसला.
पोलिस रेझिंग डे निमित्त अंबड पोलिस ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सन २०२५ मध्ये दाखल झालेल्या ११ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. चोरीस गेलेले मौल्यवान दागिने, वाहने, सोनसाखळ्या तसेच संसारोपयोगी वस्तू पुन्हा मिळण्याची आशा अनेकांनी सोडली होती. मात्र अंबड पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत तक्रारदारांशी संपर्क साधून मुद्देमाल स्वीकारण्यासाठी बोलावले.
पोलिसांकडून आलेल्या फोनमुळे अनेक तक्रारदार आश्चर्यचकित झाले. पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात चोरीस गेलेल्या वस्तू प्रत्यक्ष हातात पडताच तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले.
घरफोडीच्या तीन गुन्ह्यांतील तक्रारदारांना एकूण २४ लाख १९ हजार रुपयांचे ७०२.९ ग्रॅम सोन्याचे लगड स्वरूपात परत देण्यात आले. तसेच वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी प्रकरणांतील जप्त मुद्देमालही संबंधितांना परत करण्यात आला. घरफोडीच्या एका गुन्ह्यात सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने संबंधित महिलेवर मानसिक ताण आला होता.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, विक्रीस दिलेले सोने पथकाने सराफाकडून हस्तगत केले. दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे लगड मिळाल्याने संबंधित महिलेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.
उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते तक्रारदारांना मुद्देमाल वितरित करण्यात आला.
![]()


