
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे संकल्पनेतून गुन्हे प्रतिबंधासाठी स्टॉप अॅण्ड सर्च हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. त्याद्वारे सस्त्यावर वाहने थांबवून अचानक तपासणी केली जाते.
यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ०२:३० वाजताचे सुमारास नववा मैल येथे आडगाव सी.आर. मोबाईल चे अंमलदार पोलीस शिपाई बाळकृष्ण पवार व पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे हे स्टॉप अॅण्ड सर्च कारवाई करीत होते.
यावेळी लाल रंगाचे वाहन मारुती एस एक्स ४ क्र. एम.एच.०२ जे.पी. ०१२३ च्या चालकाने वाहन न थांबवता स्टॉप अॅण्ड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जिव वाचला.
हवालदार गांगुर्डे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देवुन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली. यानुसार नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या महिला पोलीस अंमलदार सुगंधा नवले यांनी तत्काळ इतर वाहनांना कॉल देवून मदतीस पाठविले. यावेळी मदतीसाठी आडगाव डीबी मोबाईल, आडगाव पिटर मोबाईल, पर्यवेक्षक-१ कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक डहाके, चेकींग कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक पत्की, मुंबई नाका डीबी मोबाईल, भद्रकाली पिटर मोबाईल, पंचवटी डीबी तसेच रात्रगस्त कर्तव्यावरील सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी मिळून अशा ८ वाहनांनी या संशयित वाहनाचा चित्तथरारक पाठलागा केला.
वाहनाचा हा पाठलाग सुमारे २:०० ते ३:०० वाजेपर्यंत सतत सुरु होता. हा पाठलाग ९ वा मैल ते द्वारका, द्वारका ते यु टर्न अमृतधाम, अमृतधाम यु टर्न ते के.के. वाघ कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदीर पर्यंत असा सुमारे २५ किमी सतत सुरु होता. सतत २५ किमी अंतर थरारक पाठलाग केल्यानंतर या वाहनास ताब्यात घेण्यास पोलीस दलास यश आले.
ते ताब्यात घेण्यापुर्वी आरोपीने पोलीसांच्या ४ वाहनांना धडक देवुन कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे हा पाठलाग रात्रीच्या वाहतूकीस तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात येत होता. त्या दरम्यान पाठलागा करणाऱ्या पोलीस वाहनांची प्राथमिकता ही सदर वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे घेवुन जाणे व त्याठिकाणी त्या वाहनास आणि चालकास ताब्यात घेणे ही होती. त्यानुसार सर्व पोलीस वाहनांनी आपआपसात समन्वय ठेवुन सदर वाहन निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पाडून कोणत्याही सामान्य नागरीकास तसेच वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या ताब्यात घेतले.
पाच पैकी चार इसम अंधाराचा फायदा घेवुन पळून जाण्यात यशस्वी झाले. एका आरोपीला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये २८ किलो गांजा आढळून आला. एक आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आले आहे. असा १५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारमधील संशयित आकाश गणेश डोळस (वय: ३६, राहणार: पनवेल) यास अटक केली आहे.
आरोपीवर त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन भा. न्या. सं. १०९ (१) प्रमाणे तसेच अंमली पदार्थ बाळगल्या बद्दल एन.डी.पी.एस. ८ (क), २० (ब) (ii) (c) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून गौरविले आहे.
![]()


