
नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२५: शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गंगापूर रोड परिसरातून जेरबंद केले. संशयितांच्या ताब्यातून ३१ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत मरकड व मिलींदसिंग परदेशी यांना ७ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी श्रीनिवास सुरेंद्र कानडे (वय ३३, रा. दिव्य दर्शन सोसायटी, कॉलेज रोड, विसे मळा) व त्याचा साथीदार मोहित राम तेजवाणी (वय २४, रा. गोदावरी कॉम्प्लेक्स, चिंचबन, पंचवटी) हे परवाना नसलेले देशी पिस्तूल घेऊन महाजन गार्डन, गंगापूर रोड परिसरात येणार आहेत.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, विशाल काठे, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, नाजीमखान पठाण, पोलीस अंमलदार मुक्तार शेख व सुकाम पवार अशांचे पथक तयार करण्यात आले.
पथकाने महाजन गार्डनच्या मागील बाजूस सापळा लावून दोन्ही संशयितांना चोपडा लॉन्सजवळ ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.