नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळी हाणामारी, टवाळखोरी, लुटमार आणि मद्यपान करून रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार वाढल्याने आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये गुन्हेगारांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या धडक मोहिमेत पोलिसांनी १५६ सराईत गुन्हेगारांची चेकिंग केली. तसेच, ७७ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हाणामारीच्या घटनांसह गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. नाशिकरोडसह उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड आणि सापपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
यावेळी परिमंडळ दोनमधील रेकॉर्डवरील १५६ गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली. यात शंभर गुन्हेगारांची चौकशी करून त्यांच्याकडून चौकशी फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच, नाशिकरोड, देवळाली कॅम्प हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्यांचीही चेकिंग करण्यात आली.
सातपूर हद्दीत मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चौघांविरोधात कारवाई करण्यात आली. तर, पाथर्डी गावात खुलाल चांडे यास देशी दारुच्या बाटल्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच, १३ जणांविरोधात कोटपान्वये कारवाई करून अडीच हजारांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच, ७७ टवाळखोरांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. तर अशास्वरुपाची कारवाई सातत्याने करण्याची अपेक्षा जागरुक नागरिकांनी केली आहे.