नाशिक। दि. २५ जुलै २०२५: एरवी पोलिसांकडून रात्री किंवा पहाटेच्या सुमारास गुन्हेगारांची झाडाझडती घेत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येते; मात्र गुरुवारी आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ व परिमंडळ-२च्या हद्दीत अचानकपणे भरदिवसा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. एकूण सुमारे १६६ सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करत कसून चौकशी करण्यात आली.
शहर व परिसरात वाढत्या जबरी चोरी, वाहनचोरी, हाणामारी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक वाढीस लागावा या उद्देशाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुन्हेगारांवर भरदिवसा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते.
यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहायक पोलिस आयुक्तांसह १३ पोलिस ठाण्यांचे प्रभारी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह गुन्हे शाखा युनिट-१ व युनिट-२चे पथकांनी या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.