नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर वॉच ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून सिग्नल रिमोट ऑपरेटिंग सिस्टिम बसविण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प अखेर कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असून नुकतीच त्याची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता नाशिकच्या वाहतूक कोंडीवर चांगला पर्याय उपलब्ध झाला असून नाशिककरांना आता शिस्तीत वाहन चालवावंं लागणार आहे.
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी काही नवीन नाही, हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मागील सिहंस्थ कुंभमेळ्यापासून शहरातील महत्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार होती.
अखेर या सीसीटीव्ही यंत्रणेला मुहूर्त लागला असून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणार आहे. सिग्नल नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटिव्हीद्वारे वॉच ठेवला जात आहे.
नियम तोडणाऱ्या वाहनाच्या नंबरच्या आधारे रिमोट ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे संबंधित चालकांना ई-चलन दिले जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाकडून या सिस्टिमचे काम अंतिम टप्प्यात असून सिबीएस, सिग्नलसह मेहर शहरातील सर्व सिग्नलवर लवकरच ऑनलाईन दंड आकारणी सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूम मधून नाशिककरांवर वॉच ठेवला जात आहे. शहरातील विविध भागातील 40 जागांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, त्याचे फुटेज थेट कंट्रोल रूममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे थेट सिग्नलवर बेशिस्तपणा करणाऱ्या नाशिककरांवर नजर ठेवली जात आहे.
शिवाय ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून थेट सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनधारकांना सूचना देखील केल्या जाणार आहेत. याबाबत नुकतीच एक चाचणी घेण्यात आली. यात पोलीस संबंधित वाहनाचा नंबर पुकारत चालकाला नियम पाळण्याचा सल्ला देत असल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह लवकरच सीसीटीव्हीद्वारे ई-चलान अंतर्गत कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती आयुक्तालयाने दिली.
असा आहे कंट्रोल रूम:
दरम्यान, उल्लंघन करणारे वाहन आता सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर संबंधित चालकाला सूचना दिल्या जातात. यात ट्रिपल सिट, सिट बेल्ट नसणे, हेल्मेट नसणे, सिग्नल सुरू असतांना पुढे जाणाऱ्यांना सूचना दिल्या जात आहे. तर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या कंट्रोल रुममध्ये पोलिसांसाठी 6 बाय 4 फुटाची ‘एलसीडी वॉल’ लावण्यात आली. 16 डबल पॅनलचे मॉनिटर, सिग्नलच्या ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण, ‘कमांड रूम’ व्हॉइस मोड, झेब्रा क्रॉसिंग, यू-टर्न घेणाऱ्यांवर ‘ऑटोमॅटिक ई-चलान’ अशा सुविधा उपलब्ध रमुन देण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत मेहेर, सीबीएस या सिग्नलवर ही कारवाई सुरू असून, पुढील काही दिवसांत सर्व सिग्नलवर ती राबविण्यात येणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत 800 कॅमे-यांची नाशिकवर नजर असेल. याचा फायदा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी, गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी होणार आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790