नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सात महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील विविध ३६ शाळा, महाविद्यालयांबाहेर रोमिओगिरी व दुचाकींवर स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम गुरुवारी (दि. १९) राबविण्यात आली. एकूण ९२ टवाळखोरांना खाकीचा दणका बसला.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ-१मधील गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, आडगाव, म्हसरूळ या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेले भोसला मिलिटरी स्कूल व कॉलेज, दे.ना. पाटील शाळा, मनपा शाळा क्र. २०, निर्मला कॉन्वेंट स्कूल, न्यू रचना विद्यालय, बीवायके महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय, वाघ गुरुजी स्कूल, केबीटी कॉलेज, एनडीएमव्हीपी कॉलेज परिसरात सर्वाधिक एकूण २० तर आडगावच्या हद्दीत पंचवटी, क.का. वाघ, मेट भुजबळ नॉलेज सिटी, स्वामी नारायण स्कूल या भागात एकूण १५ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात १५, म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ तर पंचवटीच्या हद्दीत १०, भद्रकालीच्या हद्दीत १२, मुंबईनाकाच्या हद्दीत ९ टवाळखोरांना पोलिसांनी शाळा महाविद्यालयाच्या परिसरात धडा शिकविला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी टवाळखोर ऑल आउट कारवाईचे आदेश सर्व प्रभारी पोलिस निरीक्षक व दामिनी पथकाला दिले होते. यानुसार पोलिसांच्या विविध पथकांनी अशा टवाळखोर, दुचाकी, चारचाकींद्वारे स्टंट करणारे, मुलींना छेडणाऱ्या संशयितांना ताब्यात घेत पोलिस ठाण्याची सफर घडविली.
महाविद्यालय व्यवस्थापनाशी साधला संवाद:
मिशन टवाळखोर ऑल आउट मोहिमेअंतर्गत शहरातील एकूण ३६ शैक्षणिक आस्थापनांच्या गुरुजनांसोबतसुद्धा पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी संवाद साधला. अधिकारी वर्गाने शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्याची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेत पोलिस मदतीच्या संपर्क क्रमांकाची माहिती देत जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास थेट संपर्क साधावा, असे सांगत भेडसावणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत चर्चा केली.