नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगार हे ड्युटीवरून रात्री घरी जात असताना अंधाराचा फायदा घेत चाकू व धारदार शस्त्राचा धाक त्यांना दाखवून त्यांच्याकडील मोबाइल तसेच रोकड हिसकावून घेत लूट करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संशयितांकडून पोलिसांनी ३० मोबाइलसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
औद्योगिक वसाहतीतील कामगारांची लूट होण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात कामगारांनी तक्रार देखील दाखल केली होती.
त्या अनुषंगाने एमआयडीसी चुंचाळे पोलिस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे यांनी लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र टीम तयार करण्यात आली.
त्यानुसार निरीक्षक मनोहर कारंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने औद्योगिक वसाहतीत सापळा रचला व मंगेश ऊर्फ मंग्या अंकुश पवार (२४), कुणाल रवींद्र पगार (२४), नीलेश ऊर्फ निल्या देवीदास खरे (२२), कुणाल यादव जाधव (२४) या चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता जबरी चोरी केलेल्या मोबाइलपैकी एक मोबाइल फोन मिळून आला.
आरोपींकडे त्यांच्या इतर साथीदारांबाबत व जबरी चोरी केलेल्या इतर मोबाइलबाबत कसून तपास करून विचारणा केली असता ३० मोबाइल फोन, एक धारदार चाकू, दोन मोटारसायकली असा एकूण तीन लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे, समाधान चव्हाण, जनार्दन ढाकणे, अनिल कुन्हाडे, सुरेश जाधव, श्रीकांत सूर्यवंशी आदींनी केली.