नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंद्यापाठोपाठ रात्रीच्या वेळी विशेष मोहीम राबवून टवाळखोर, पानटपऱ्या व कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांसह प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आयुक्तालय हद्दीमध्ये पोलीस ठाणेनिहाय सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यत धडक विशेष मोहीम राबविली. यात पोलिसांनी २४४ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच, शहरातील २८४ पानटपऱ्यांची कसून तपासणी करीत, कोटपाअंतर्गत १०५ कारवाई करण्यात आल्या.
तसेच शहरात कर्णकर्कश हॉर्न वाजवून सुसाटपणे दुचाक्या चालविणाऱ्या १५ चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विशेष पथके, गुन्हेशाखांची पथकेही सहभागी झाले होते.