नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एकीकडे पोलिसात गुन्हा दाखल होत आहेत. सिडकोतील खासगी सावकार वैभव देवरे याचे प्रकार गाजत असताना, पंचवटीतील लामखेडे मळ्यातील एकाने तिघा सावकारांचे व्याजासह पैसे परत केल्यानंतरही त्यांनी त्याचे राहते घर बळजबरीने बळकावले असून, ते रिकामे करण्यासाठी तगादा लावला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात तिघा सावकारांविरोधात खंडणीसह अवैध सावकारी कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नितीन करसन परमार (४७, रा. साई अपार्टमेंट, जुना आडगाव नाका, पंचवटी), विकास सुनील पाटील (४१, रा. शिवसाई, कलानगर, दिंडोरी रोड), अनिल दत्तात्रय नेरकर (५८, रा. पोकार संकुल, साईनगर, आरटीओ कॉर्नर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित खासगी सावकारांची नावे आहेत.
सोमनाथ गंगाधर कारे (रा. गोकुळधाम रेसीडेन्सी, लामखेडे मळा, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा प्रमोद कारे याने संशयितांकडून ८ टक्के व्याजाने ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रमोद याने संशयितांचे पैसे व्याजासह मुद्दल पैसे परत केले आहेत. तरीही संशयितांकडून त्याच्याकडे ९ लाख रुपयांची मागणी करीत होते. त्यासाठी संशयितांनी प्रमोद कारे यांच्या दोन मोटारसायकली घेऊन गेले. तसेच, त्यांचे राहते घराचे कागदपत्रे तयार करून त्यावर प्रमोद याच्या बळजबरीने सह्या घेतल्या आहेत.
दरम्यान, पुण्याला गेलेले प्रमोदचे आईवडील हे परत आले असता, त्यांना सदरचा प्रकार समजला. संशयित प्रमोद यास सारखे धमकावत असल्याने तो १४ तारखेला घरातून निघून गेला असून, त्यासंदर्भात बेपत्ताची नोंदही करण्यात आलेली आहे. तरीही संशयितांनी गुरुवारी (ता. १८) संशयित नितीन परमार, अनिल नेरकर यांनी कारे यांच्य घरी येत त्यांना तात्काळ घर रिकामे करण्याची धमकी दिली.
त्यामुळे कारे यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता. १९) रात्री तिघा संशयितांना अटक केली आहे. (पंचवटी पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २४२/२०२४)