नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या वर्षभरापूर्वी एका कंपनीतून लाखो रुपयांचा माल चोरी करून पलायन करणाऱ्या १५ संशयित चोरट्यांच्या एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी शिताफीने मुसक्या बांधल्या. या सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या सिमेंस कंपनीत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलिस करत असताना पोलिस शिपाई सावंत व सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संतोष शिंदे यास अगोदर ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. त्याने साथीदारांसह कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक अनिल पाडेकर, जनार्दन ढाकणे, महेश सावंत, श्रीकांत सूर्यवंशी, अनिल पाडेकर, सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, कुऱ्हाडे यांच्या पथकाने टोळीचा शोध घेण्यास सुरुवात करत छडा लावला.
२२ लाख रुपये किमतीचे कॉपर, पाच लाख रुपये किमतीचा जेसीबी, सहा लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप, सहा लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या, पंधरा हजार
रुपये किमतीची मोटारसायकल, चार हजार रुपये किमतीची कटर मशीन, सहा हजार रुपये किमतीचा व्हिल बॅरो असा एकूण ३९ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अशी आहे टोळी:
संशयित आरोपी संतोष शिंदे (४२, दत्तनगर अंबड), लक्ष्मीकांत होळकर (रा. लासलगाव), भारत मंजुळे (३४, रा. गुळवंच), संजय लक्ष्मण वानखेडे (३६ रा. सिंहस्थनगर सिडको), शिवराम डहाळे (३७, घरकुल योजना अंबड, नाशिक), महेश्वर भंडारी (वय ३५. घरकुल योजना चुंचाळे शिवार), जनार्दन गायके (४३, अंबड), विनोद निकाळे (३२, रा. पंडितनगर सिडको), राजू शेळके (४३, रा. अंबड), संजय वाणी (४०, रा. सिडको), जयेश पाटील (२३, सातपूर), राहुल चंद्रकोर (२९, उत्तमनगर, सिडको, नाशिक), मोहम्मद हुसेन चौधरी (३२, रा. जाधव संकुल ), मुस्ताक शेख उर्फ भुच्या (३०, रा. पवननगर) हरीलाल मौर्य (४३, रा. घरकुल योजना चुंचाळे अंबड).
टोळीतील संशयित हे कारखान्यांमध्ये व्यवस्थापनाकडून ठेका घेऊन कंपनीच्या आवारातच कामे करत होते. कंपनीतच काम करून सर्व माहिती घेऊन चोरीचा प्रकार घडला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण व पारंपरिक कौशल्याचा वापर करत पोलिस पथके संशयितांच्या मागावर होती. अखेर पोलिसांना टोळीचा छडा लावण्यात यश आले. – मनोहर कारंडे, पोलिस निरीक्षक