नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रागाच्या भरात अल्पवयीन मुलीने घर सोडल्यानंतर पंचवटी पोलिसांनी पालकत्वाची भूमिका निभावत तत्परतेने तपास करत दोन तासांत तिचा शोध लावत तिला तिच्या पालकांकडे सुखरूपरित्या सुपूर्द केले. या मुलीसह इतरही दोन बालकांचा शोध पोलिसांनी लावला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

याबाबत वृत्त असे की, १ डिसेंबरला एक १६ वर्षीय मुलगी आईशी भांडण करून रागाच्या भरात घर सोडून गेली. ही माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक मिथुन परदेशी, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड, हवालदार अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, राकेश शिंदे, कुणाल पचलोरे, नितीन पवार, गोरक्ष साबळे यांना तपास करण्याची सूचना दिली.
या पथकाने आपल्या कौशल्याचा वापर करत अवघ्या दोन तासांत या मुलीचा शोध लावून तिच्या आजीच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केले.
दुसऱ्या एका घटनेत २ डिसेंबरला १६ वर्षीय मुलगी कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. ही माहिती रात्रपाळी कर्तव्यावर असलेले गुन्हे शोधपथकास मिळताच तिचा शोध घेऊन आपले कौशल्य व जनसंपर्काचा वापर करून अवघ्या आठ तासांत सदर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
३ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता १३ वर्षीय मुलगा शाळेच्या कारणावरून रागावल्याने घरातुन निघून गेला होता. गुन्हे शोधपथकास मिळताच कौशल्य व जनसंपर्काचा वापर करून अवघ्या दोन तासांत शोध घेवून त्यास अंबड परिसरातील खुटवडनगर येथून ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. पंचवटी पोलिसांच्या या कामगिरीचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी कौतुक केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790