नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करणार- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

नाशिक। दि. ३१ ऑक्टोबर २०२५: आदिवासी विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुण विकसित होण्यासाठी ६०० विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी येथे केले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते आज सकाळी स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार नितीन पवार, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त गोपीचंद कदम, दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी नरेश अकुनूरी (कळवण), अर्पिता ठुबे (नाशिक) उपस्थित होते. मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. उदघाटन सत्रानंतर विविध क्रीडा प्रकारांना सुरूवात झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, आदिवासी विद्यार्थी कल्पक आणि गुणवान आहेत. राज्यात ३७ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू आहेत. तेथे ११ हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांमधून खेळाडू घडण्यास मदत होणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

आदिवासी विकास विभागाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणवंत विद्यार्थी घडवावेत. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विजय किंवा पराभव न मानता खिलाडू वृत्ती दाखवावी. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देत त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करोवत, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी खासदार डॉ. बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विकास आयुक्त श्रीमती बनसोड यांनी प्रास्ताविकात या स्पर्धांची माहिती दिली.

दोन हजारांवर विद्यार्थ्यांचा सहभाग:
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या राज्यात ३७ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहेत. तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा होतात. तीन दिवस या स्पर्धा सुरू राहतील. या स्पर्धेत दोन हजार ७०४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यात एक हजार ४२७ मुलांचा, तर एक हजार २७७ मुलींचा समावेश आहे. या स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात खेळविण्यात येणार आहेत. वैयक्तिक प्रकारात तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिन्टन, बॉक्सिंग, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स, ज्यूदो, टेनिस, शूटिंग, पोहणे, टेबल- टेनिस, तायक्वांदो, वेटलिफ्टिंग, कुस्ती (फ्री स्टाइल), योगा आदी १५ प्रकारात, तर सांघिक प्रकारात बास्केट बॉल, फुटबॉल, हॅण्‍डबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल आदी सात खेळांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790