नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): निवडणुकीची धावपळ सुरू असल्याने जिल्हा प्रशासन तथा निवडणूक प्रशासनाकडून शहर व जिल्ह्यात गस्त सुरू असताना तहसीलदारांच्या पथकाने पेठरोडवरील राऊ हॉटेल परिसरात एका व्यावसायिकाच्या वाहनातून पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही रोकड निवडणुकीसाठी वापर होणार असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. सोमवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजता पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तहसीलदार शोभा पुजारी यांचे पथक नाशिक मध्य व पूर्व विधानसभा परिसरात गस्तीवर असताना एक कार संशयास्पद फिरत असल्याचे आढळले. पथकाने संशयित कारचा पाठलाग केला. कार गुजरातकडे जात असताना राऊ हॉटेल चौकात कार थांबवली. कारची झडती घेतली असता कारमध्ये पाच लाखांची रोकड मिळून आली. रोकडबाबत माहिती देण्यास कारचालक असमर्थ ठरल्याने रोकड निवडणूक कामाकरिता वापर करण्यास असल्याचा संशय पथकाने व्यक्त केला. जिल्ह्यात रोकड जप्त करण्याचा हा पहिलाच गुन्हा असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.