नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने गर्दीचे नियोजन व सुरक्षिततेच्या दृष्टीने सी.सी.टीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जलदगतीने कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कुंभमेळा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, त्र्यंबकेश्वर नगर परिषेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया दवचक्के यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्यातर्फे कुंभमेळा दृष्टीने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सी.सी.टीव्ही यंत्रणेचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. ते म्हणाले की, शहरात सद्य:स्थितीत 1 हजार 300 सी.सी.टीव्ही स्मार्ट सीटीच्या माध्यमातून बसविण्यात आलेले आहेत. यापेक्षा आवश्यकतेनुसार व निकड लक्षात घेवूनच शहरात व त्र्यंबकेश्वर येथे सी.सी.टीव्हींची संख्या वाढवून 31 मार्च पर्यंत ते कार्यान्वित करावेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे साधुग्रामसाठी निश्चित जागा उपलब्ध करून तसा प्रस्ताव सादर करावा. आग प्रतिबंधासाठी पोलीस व महानगरपालिका व आग प्रतिबंधक यंत्रणा यांनी समन्वयाने धोकादायक स्थळे निश्चित करावीत,अशाही सूचना त्यांनी केल्या.
कुंभमेळा यशस्वितेसाठी येणाऱ्या काळात प्रयागराज येथे आभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी यावेळी सांगितले.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790