नाशिक (प्रतिनिधी): आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील तीन जोडप्यांच्या ब्रेकअपची कथा अनोख्या पद्धतीने मांडणाऱ्या ‘द एंड’ या हिंग्लिश अर्थात हिंदी-इंग्लिश नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी नाशिककरांना रविवारी मिळणार आहे.
मुंबईतील परवाना थिएटर्सच्या या नाटकाचे सहलेखन नाशिकच्या मिताली काळगी हिने केले असून तीचा त्यात अभिनयही आहे. या नाटकाचा प्रयोग दि. ३० जून रोजी सायंकाळी ७ वाजता कामगार नगर येथील आनंद निकेतन शाळेच्या सभागृहात होणार आहे.
ब्रेकअपच्या वैयक्तिक अनुभवातून प्रेरित होऊन निकिता सिंग हिने हे नाटक साकारले आहे. वयाच्या विशीमध्ये असलेले एक कॉलेजातील प्रेमी युगल, वयाच्या तीशीतील लिव्ह -इन रिलेशनमधील एक आणि वयाच्या चाळीशीतील विवाहीत अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील तीन जोड्यांच्या ब्रेकअपची ही कथा आहे. आधी प्रेमात पडून आता काठावर आलेल्या या जोडप्यांच्या प्रेमकथेची अखेर असली तरी आयुष्याची आहे का? या प्रश्नाचा अभिनय, संगीत आणि कविता या माध्यमातून अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने वेध घेण्याचा या नाटकातून प्रयत्न केलेला आहे. नाटकाच्या प्रवेशिकांसाठी 9324737386 या क्रमांकावर संपर्क साधावा.