नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील गुन्हेगारीला पायबंध घालताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिस विभागाला दिले. अल्पवयीनांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले असून, अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी मोहीम राबविण्यात येईल. नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, सुरक्षित कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री कदम यांनी मंगळवारी (ता. २८) नाशिक पोलिस आयुक्तालयाचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे. शहराच्या वाढत्या विस्तारासोबत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे गरजेचे आहे. शहर आयुक्तालयाच्या अखत्यारीत १३ पोलिस ठाणी आहेत.
भविष्याचा विचार करता शासनाकडे प्रलंबित असलेल्या पोलिस आयुक्तालय हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. नाशिकमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सहपोलिस आयुक्तपदाची मागणी करण्यात आली आहे, त्याबाबतही चाचपणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मंत्री कदम पुढे म्हणाले, की अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी पोलिसांच्या पातळीवर अभियान राबविण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नाशिकमध्ये गेल्या आठ महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या २५० घटना घडल्या. त्यामध्ये दोन गँगवर पोलिसांनी कारवाई केली. नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात नाशिक पोलिसांनी उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया सुविधेचे त्यांनी कौतुक केले.