नाशिक (प्रतिनिधी): पायाभूत सुविधा नाही तर घरपट्टी, पाणीपट्टी का भरायची, असा सवाल करीत खड्ड्यांविरोधात प्रभाग २४ मधील संतप्त रहिवाशी बुधवारी रस्त्यावर उतरले. ‘खड्डे दर्शन, हेच नाशिक पर्यटन’ अशा घोषणा देत भरपावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने हे आंदोलन केले. रस्ते दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रभाग २४ मधील गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खांडे मळा या सर्वच भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने अनेकदा निवेदन देवूनही खड्डे बुजविले जात नव्हते. आज कर्मयोगीनगर येथे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. “नाशिक दर्शन… खड्डे पर्यटन!”, सांगा! घरपट्टी, पाणीपट्टी का भरायची, असा सवाल करणारे बॅनर आंदोलकांनी हाती घेतले होते.
रस्ते दुरुस्ती झालीच पाहिजे, निष्क्रिय प्रशासनाचा धिक्कार असो, शिवसेना जिंदाबाद, रहिवाशांच्या एकजुटीचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
महापालिका शाखा अभियंता जगदीश रत्नपारखी, विनीत बिडवाई, हिरामण दातीर हे या ठिकाणी हजर झाले. जेसीबी बोलावून तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. जादा मनुष्यबळ वापरून गणेशोत्सवापर्यंत खड्डे बुजवून प्रभागातील सर्व रस्ते दुरूस्त करण्यात येतील, खडीकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर एक तास चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, शांताराम मोरे, दत्तात्रय वाघ, अशोक गाढवे, संजय राठी, नितीन मराठे, मनोज अट्रावलकर, राहुल कदम, गोविंद गांगुर्डे, आनंदा तिडके, उत्तमराव कर्डक, राजेंद्र डागा, वसंतराव सुपारे, शिवाजी मेणे, जगन्नाथ कुरे, संदीप गहिवाड, वंदना पाटील, संगिता देशमुख, वैशाली मराठे, स्वाती अट्रावलकर, सुनंदा वाणी, अनिता कर्डक, गायत्री शेलार, जयश्री चौधरी, शोभा कुरे, आशा सांगळे, उषा कदम, मिना कानडे, वंदना जाधव, मिनल पाटील, सुमन वाघ, मंदा पवार, स्मिता गाढवे, श्वेता शिंदे, रश्मी आपटे, अनारकली सुपारे, योगिता गहिवाड आदी सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी ठिय्या करणार:
सर्व रस्ते दुरुस्त केले नाहीत तर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल. महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांचा अंत पाहू नये, असा इशारा शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी दिला.